चिंचवड (Pclive7.com):- सोसायटीसमोरील फॅब्रिकेशन गोडावूनमध्ये पार्क केलेल्या इनोव्हा कारमधील तीन लाख रुपयांची रोकड संमतीशिवाय घेऊन एक तरुण आपल्या मूळ गावी निघून गेला. ही घटना ५ नोव्हेंबर रात्री साडेनऊ ते ६ नोव्हेंबर सकाळी साडेसहाच्या दरम्यान चिंचवडगावातील केशवनगर येथे घडली.

याप्रकरणी महेंद्र राजपूत (वय २०, रा. बलिराज धुरीखेडा, निहास्था, रायबरेली, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन संपतराव काकडे (वय ४७, व्यवसाय शेती, रा. फ्लॅट क्रमांक १०४, एच विंग, गोयल गरिमा सोसायटी, केशवनगर, चिंचवडगाव) यांनी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने गोडावूनमध्ये पार्क केलेल्या इनोव्हा कारमधील (एमएच १४ एलयू ०९५५) तीन लाख रुपयांची रोकड फिर्यादीच्या संमतीशिवाय घेतली आणि उत्तर प्रदेशातील मूळ गावी निघून गेला. तो परत येईल म्हणून फिर्यादीने काही दिवस वाट पाहिली. दरम्यान, दिवाळी सणासाठी फिर्यादी आपल्या मूळ गावी गेले असता त्यांनी आरोपीला फोन केला; मात्र आरोपीने फोन उचलणे बंद केल्याने चोरीची खात्री पटली.



















Join Our Whatsapp Group