पिंपरी (Pclive7.com):- भरधाव कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने झेप्टो कंपनीत डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी तरुणाला मदत न करता कंटेनरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना शनिवारी (दि. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीसमोर ग्रेड सेपरेटर रस्त्यावर घडली. अंकित अशोक मगर (रा. निगडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचे वडील अशोक उत्तम मगर (५५) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कंटेनरचालक प्रदीप उदेशराम कुमार (२८, मूळ रा. औरंगाबाद, बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा डिलिव्हरीचे काम करण्यासाठी मोटारसायकलवरून निगडीकडून पिंपरीच्या दिशेने जात होता. त्या वेळी बजाज ऑटो कंपनीसमोर आरोपीने वाहतुकीकडे दुर्लक्ष करून कंटेनर मागे घेतला. त्यामुळे अंकितच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली.

या अपघातात डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने अंकितचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमी अंकितला वैद्यकीय मदत न करता पलायन केले. निगडी पोलिस तपास करत आहेत.



















Join Our Whatsapp Group