उन्नती सोशल फाउंडेशनच्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न; विजेत्यांसह २५ स्पर्धकांचा गौरव
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि गड-किल्ल्यांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत बालचिमुकल्यांनी साकारलेल्या विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधून त्यांची कल्पकता, कलात्मकता आणि इतिहासाविषयीची आवड पाहायला मिळाली.

या स्पर्धेत युवराज राऊत आणि गोपाल प्रतिष्ठान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वराज प्रतिष्ठान यांनी द्वितीय, तर आरती पुजारी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच श्रीयांश कुंजीर, आदित्य रोडे आणि आम्ही शिवबाचे मावळे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास २५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.

या बक्षीस वितरण समारंभास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिता काटे, केशव शंखनाद पथकाच्या प्रणिता अवधूत, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक वारकर, आनंद हास्य योगा क्लबचे अध्यक्ष दिगंबर राजगुरे, अनिल कुलकर्णी, रमेश वाणी, राजू शेलार आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर फिरोज मुजावर यांनी आपल्या लालित्यपूर्ण पदन्यासातून गणेश वंदना सादर केली. त्यांच्या बहारदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भामिनी महाले आणि सागर बिरारी यांनी केले.
डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ वाचण्याचा विषय नसून तो प्रत्येक पिढीने समजून घेण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा विषय आहे. गड-किल्ले हे आपल्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. आजच्या बालकांनी स्वतःच्या कल्पकतेतून किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत इतिहासाशी जोडले जाणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण होते, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमानाची भावना रुजते. उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालमित्रांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.”

इतिहासाशी नाळ जोडणारा उपक्रम!
आजच्या डिजिटल युगात बालकांना आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख व्हावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास त्यांच्या मनावर बिंबवला जावा, या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशा उपक्रमांमधून बालकांमध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण होण्याबरोबरच सर्जनशीलता, संघभावना आणि आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमानाची भावना विकसित होण्यास मदत होते.
स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बालकांचा सहभाग पाहता आयोजकांनी समाधान व्यक्त केले. सर्व विजेते, सहभागी स्पर्धक, पालक आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.


















Join Our Whatsapp Group