पाच दिवसांच्या दिवाळी सुट्टीनंतरही गुरुवार, शुक्रवार अनेक अधिकारी-कर्मचारी गैरहजर; नागरिकांना नाहक त्रास
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सलग पाच दिवस सुट्टी देण्यात आली होती. मात्र, ही सुट्टी संपल्यानंतरही गुरुवार, दि.१२ नोव्हेंबर आणि शुक्रवार, दि.१३ नोव्हेंबर २०२६ रोजी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने सुट्ट्या घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध प्रभाग कार्यालये आणि करसंकलन कार्यालयांमध्ये आपल्या कामासाठी आलेल्या नागरिकांना संबंधित अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्टीनंतरही आणखी दोन दिवस मनमानी पद्धतीने सुट्ट्या घेतल्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे.

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाखोंच्या घरात वेतन मिळते. तसेच लाखोंच्या घरात बोनस दिला जातो. असे असतानाही नागरिकांच्या कामांना प्राधान्य न देता अधिकारी व कर्मचारी मनमानी करत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका ही करदात्या नागरिकांच्या पैशातून चालते आणि अधिकारी-कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे, असे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी विनापरवानगी किंवा मनमानी पद्धतीने गैरहजर राहिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवावा. तसेच संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार महापालिकेच्या कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी, अशी अपेक्षाही रमेश वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.


















Join Our Whatsapp Group