नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा वापर करण्याचे आवाहन
पुणे (Pclive7.com):- डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत भिडे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि नारायण पेठ, शनिवार पेठ तसेच लक्ष्मी रस्ता परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वर पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे पेठ परिसरातील नागरिकांसह या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.

या पादचारी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भिडे पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे.

भिडे पूल बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मेट्रो प्रशासन प्रयत्नशील असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, या कामामुळे पुणेकरांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


















Join Our Whatsapp Group