पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; मुंबई, ठाणे आणि पुण्यातील सात आरोपींना अटक
पिंपरी (Pclive7.com):- दुबईतून भारतातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी तब्बल १० हजार ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या सिमकार्डचा वापर करून देशभरात सायबर फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीसाठी बेकायदेशीररीत्या सिमकार्ड पुरविणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तपासादरम्यान अनेक आरोपी परदेशात राहून बनावट बँक खाती आणि मोबाईल सिमकार्डच्या माध्यमातून सायबर गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीला तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) हा या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. तो दुबईत राहून सायबर गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सुमंत दसरे याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले होते. इंटरपोलच्या माध्यमातून त्याला भारतात आणण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या चौकशीत तो चीनमधील एका नागरिकासोबत मिळून सायबर फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले. या गुन्ह्यांसाठी लागणारे १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड त्याने भारतातून मिळविल्याचेही तपासात समोर आले.

मुंबई, अंबरनाथ आणि कल्याणमधून सिमकार्ड पुरवठादारांना अटक
तपासादरम्यान मनिष अशोकलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व) आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी (वय ६०, रा. कल्याण पश्चिम) यांचा या सिमकार्ड पुरवठ्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांना मुंबई परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. या दोघांनी सुमंत दसरे याला दुबईत पुरविलेली सिमकार्ड सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे पश्चिम, मूळ रा. वैशाली, बिहार) यांच्याकडून मिळविल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी सुरज आणि राजा यांनाही अटक केली.
ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून परस्पर विक्री..
सुरज चिकवा आणि राजा कुमार हे मोबाईल सिमकार्ड विक्री कंपनीमध्ये काम करत होते. ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढल्यानंतर संबंधित ग्राहकांना ओटीपी एक्सपायर झाला, सर्व्हर उपलब्ध नसल्याने सिमकार्ड ॲक्टिव्ह झाले नाही, अशी खोटी कारणे सांगून त्यांना सिमकार्ड दिले जात नव्हते. त्याऐवजी ही सिमकार्ड अन्य आरोपींना पुरवून त्याबदल्यात आर्थिक मोबदला घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या सिमकार्डचा वापर सायबर फसवणुकीसाठी..
कॉलिंग, बनावट ॲप्लिकेशनची नोंदणी, बँक खात्यांशी लिंक करून आर्थिक व्यवहार, तसेच बनावट ई-मेल आयडी तयार करण्यासाठी केला जात होता. स्वतःची ओळख लपवून सायबर गुन्हे करण्यासाठी या सिमकार्डचा वापर होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, मनिष वाधवा आणि महेश चौइथरामानी यांच्या पासपोर्टची तपासणी केली असता ते २५ ते ३० वेळा दुबईला गेल्याचे आढळून आले आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि पुरविण्यात आलेल्या सिमकार्डचा इतर किती सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सात आरोपींची नावे आणि भूमिका
१. तुषार अमराराम चौधरी – बँक खातेधारक
२. आदर्श संतोष वाघमारे – बँक खाते हाताळणारा
३. सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे – मुख्य आरोपी, दुबईतून सायबर गुन्हे
४. मनिष अशोकलाल वाधवा – दुबईत सिमकार्ड पुरवठा
५. महेश कन्हैयालाल चौइथरामानी – दुबईत सिमकार्ड पुरवठा
६. सुरज मुन्नालाल चिकवा – सिमकार्ड मिळवून देणारा
७. राजा अशोक कुमार – सिमकार्ड मिळवून देणारा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, सागर पोमण यांच्यासह पोलीस पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

















Join Our Whatsapp Group