पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेला विषय अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तहकूब सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ७ नावे सादर केली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि भाजपचे सात असे एकूण दहा स्वीकृत नगरसेवक महापालिकेत नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या. या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवकपदांसाठी सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे दिली आहेत. मात्र, भाजपकडून गेल्या अनेक महिन्यांपासून स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली जात नव्हती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या नावांमध्ये बदल व्हावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय सातत्याने पुढे ढकलला जात होता. विविध कारणे देत सत्ताधारी भाजपकडून हा विषय लांबणीवर टाकण्यात येत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.

अखेर आता भाजपने स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा निर्णय घेतल्याचे समजते. २० नोव्हेंबरच्या तहकूब सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर नियुक्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीची तीन नावे आधीच निश्चित असल्याने भाजपकडून सात नावे सभेत सादर करून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळणार का, याकडे इच्छुकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या सात जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.


















Join Our Whatsapp Group