पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि प्रशासकीय कारभाराबाबत नगरसेवक विनोद नढे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत महापालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार आयुक्तांच्या आदेशाने काढून घेण्यात आला आहे.

नगरसेवक विनोद नढे यांनी दि.३ नोव्हेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना सविस्तर पत्र देऊन पाणीपुरवठा विभागातील कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. पाणीपुरवठा विभागातील निविदा प्रक्रिया, कामांच्या मंजुरीतील अनियमितता, कथित लाच मागणी प्रकरण तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
नढे यांनी आपल्या पत्रात सुमारे १९ हजार रुपयांच्या कथित लाच मागणीच्या प्रकरणाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त विभागीय जबाबदारी देण्याबाबतही आक्षेप नोंदवले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत आदेश निर्गमित करून सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आलेला पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार निरस्त केला आहे. तसेच शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख म्हणून असलेली जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केल्यास प्रशासनाला निर्णय घ्यावेच लागतात, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असावी, जनतेच्या पैशांचा विनियोग नियमानुसार व्हावा आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित व्हावी, हीच आपली भूमिका असल्याचे नगरसेवक विनोद नढे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातील कथित अनियमितता आणि लाच मागणीच्या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















Join Our Whatsapp Group