निगडी (Pclive7.com):- निगडी परिसरातील विकासकामांना गती मिळण्याच्या दृष्टीने नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे व स्थायी समिती मध्ये केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. निगडी स्मशानभूमीचा विकास, माता अमृतानंदमयी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा तसेच अंकुश चौक ते त्रिवेणीनगर दरम्यान ग्रेड सेपरेटर उभारणे या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे.

निगडी स्मशानभूमीच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सुलभा उबाळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
त्याचबरोबर माता अमृतानंदमयी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. या रस्त्याचा विकास झाल्यास परिसरातील नागरिकांसह मठात येणाऱ्या भाविकांचीही सोय होणार आहे.

अंकुश चौक ते त्रिवेणीनगर दरम्यान वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या मार्गावर ग्रेड सेपरेटर उभारण्याची आवश्यकता असून, यासाठीही सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या तिन्ही विकासकामांच्या नियोजनासाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी मिळाल्याने पुढील प्रक्रियेला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांच्या माध्यमातून निगडी परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेल्या या मंजुरीमुळे निगडी परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

















Join Our Whatsapp Group