पिंपरी (Pclive7.com):- भोसरी-आळंदी रोडवरील मॅगझिन चौकाजवळील पिरॅमिड हॉटेल परिसरातील गट क्रमांक १५५ येथे शनिवारी पहाटे सुमारे ४.१० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तीन लाकडी वखारी, एक केमिकल कंपनी आणि परिसरातील एका निवासी इमारतीला आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी दाट पत्राशेड, आजूबाजूला लागून असलेल्या कंपन्या आणि अरुंद रस्ते असल्याने आग विझवताना अग्निशमन दलास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, भोसरी, मोशी, नेहरूनगर, पिंपरी, चिखली, तळवडे आणि चऱ्होली अग्निशमन केंद्रांतील एकूण नऊ अग्निशमन वाहने आणि ५२ जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीचा फैलाव रोखला आणि सुमारे दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत लाकडी वखारी आणि केमिकल कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, जवळील निवासी इमारतीलाही आगीची झळ बसली. अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग अन्य कंपन्या आणि इमारतींपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

















Join Our Whatsapp Group