शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची महासभेत तीव्र नाराजी; वेस्ट टू एनर्जी प्रकल्पालाही केला विरोध
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळत असताना दुसरीकडे रावेत, किवळे आणि विकासनगर परिसरात कचरा व्यवस्थापनाची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी महापालिकेच्या महासभेत उपस्थित केला. प्रभाग क्रमांक १६ मध्ये तब्बल ७ ते ८ दिवस कचरा उचलण्यासाठी गाडी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीवरून तरस यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली.

महासभेत प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका मांडली. यामध्ये प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध
दुर्गा टेकडी आणि परिसराच्या पर्यावरणावर कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही खेळ होऊ नये, यासाठी प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवू नये, अशी ठाम भूमिका ऐश्वर्या तरस यांनी मांडली. पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.

स्वच्छतेचा पुरस्कार आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील विसंगती
महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असला, तरी प्रभाग क्रमांक १६ मध्ये कचऱ्याची दयनीय अवस्था आहे. काही ठिकाणी सात ते आठ दिवस कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. एका बाजूला स्वच्छतेचा पुरस्कार आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना भेडसावणारी अस्वच्छता, यातील विसंगती त्यांनी सभागृहात मांडली. पुरस्काराबद्दल महापौरांचे अभिनंदन करतानाच प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
चिकन वेस्टच्या वाहतुकीमुळे दुर्गंधीचा त्रास..
चिकन वेस्टची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर कचरा सांडत असल्याने रावेत-किवळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, बेजबाबदारपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी तरस यांनी केली.
पुरस्कारांपेक्षा जमिनीवरील वास्तव महत्त्वाचे..
कागदावरील स्वच्छतेपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष स्वच्छ परिसर मिळणे आवश्यक आणि विकासापेक्षा नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च आहे, अशी भूमिका ऐश्वर्या तरस यांनी मांडली. प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महासभेत आवाज उठवला असून, यापुढेही नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढत राहणार असल्याचे नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी स्पष्ट केले.


















Join Our Whatsapp Group