पिंपरी (Pclive7.com) : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात विन टेंपल क्लबने बजरंग दल संघाचा चार गडी राखून पराभव केला. हरी सावंत याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे विन टेंपल क्लबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना बजरंग दल संघाचा डाव १८.२ षटकांत अवघ्या ८३ धावांवर आटोपला. सुशांत कांबळे (२३ धावा) आणि ओंकार यादव (१३ धावा) यांनी संघाकडून थोडाफार प्रतिकार केला. विन टेंपल क्लबच्या हरी सावंत आणि वेरून चोदरी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर राकेश जे. आणि रोहित चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत बजरंग दलाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
विजयासाठी ८४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विन टेंपल क्लबने १२.४ षटकांत सहा गडी गमावून ८७ धावा करत विजेतेपदावर नाव कोरले. हरी सावंत याने अवघ्या ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला ललित सुसळे (१९ धावा) आणि विहान बागड (१४ धावा) यांनी चांगली साथ दिली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हरी सावंतला सामनावीर घोषित करण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे रणजीपटू आणि एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीएचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहीतेपाटील, स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव, मुकेश गुजराती, प्रशांत तेलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगदीश शेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजू कोतवाल यांनी प्रास्ताविक केले, तर संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुकेश गुजराती यांनी आभार मानले.
वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी..
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : गणेश कालेल
सर्वोत्कृष्ट फलंदाज : यश जाधव
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : हरी सावंत
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : पारस चव्हाण
अंतिम सामन्याचा निकाल :
बजरंग दल : १८.२ षटकांत सर्वबाद ८३ धावा (सुशांत कांबळे २३, ओंकार यादव १३, हरी सावंत ३/१६, वेरून चोदरी ३/१८, राकेश जे. २/३, रोहित चौधरी २/१३).
विन टेंपल क्लब : १२.४ षटकांत ६ बाद ८७ धावा (हरी सावंत नाबाद ४३, ललित सुसळे १९, विहान बागड १४, गणेश कालेल ३/११).
सामनावीर : हरी सावंत.


















Join Our Whatsapp Group