पिंपरी (Pclive7.com) : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनसंख्या, अपुऱ्या पार्किंग सुविधा, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत केली. प्रस्तावित पार्किंग धोरणाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.

रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी बेवारस तसेच वापरात नसलेली वाहने पडून आहेत. अशा वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनधारकांना नोटिसा द्याव्यात. अनधिकृत पार्किंग आणि बेवारस वाहनांवर नियमानुसार कारवाई करून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियमित मोहीम राबवावी, अशी मागणी कलाटे यांनी केली.
फूटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवा!
प्रभागातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. फूटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाड्या, दुकानदारांचे साहित्य आणि अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. याचा सर्वाधिक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. फूटपाथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित वापरासाठी असून ते अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुले ठेवावेत. अतिक्रमणांवर नियमित आणि प्रभावी कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

आरोग्य आणि स्वच्छता सुविधांबाबतही प्रशासनाला धारेवर
प्रभागातील आरोग्य सुविधांचा दर्जा, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींबाबतही कलाटे यांनी प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदोपत्री निकाली काढण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांचे निराकरण करावे. आवश्यक आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, ‘ज’ प्रभाग समिती अध्यक्षा आरतीताई चोंधे, सर्व नगरसेविका व नगरसेवक, पोलीस वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहराचा सुनियोजित विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणमुक्त फूटपाथ, शिस्तबद्ध पार्किंग आणि दर्जेदार आरोग्य सुविधा या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी. नागरिकांच्या हक्काच्या सुविधा मिळेपर्यंत या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी स्पष्ट केले.


















Join Our Whatsapp Group