आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम; दोन्ही गावांत जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक सागर गवळी यांच्या पुढाकारातून वाजवणे आणि देवाशी या दुर्गम गावांतील एकूण १०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही गावांना भेट देऊन कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली.

खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील दुर्गम भागात वाढदिवसानिमित्त मदत उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सागर गवळी यांनी वाजवणे आणि देवाशी येथील गरजू आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक साहित्याच्या वाटपाचे आयोजन केले. आमदार लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत, कुटुंबांना घरात रोजच्या वापरासाठी उपयोगी पडेल असे साहित्य देण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.

वाटपावेळी नगरसेवक सागर गवळी यांच्यासह किशोर गवळी, तानाजी जाधव, वसंत जाधव, संजय डुकरे आणि कैलास साकोरे उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले.
“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावावा, या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबविला. वाजवणे आणि देवाशी या दोन्ही गावांत प्रत्यक्ष जाऊन १०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवता आल्या, याचे समाधान आहे. या कामात साथ देणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– सागर गवळी, नगरसेवक, भाजपा.


















Join Our Whatsapp Group