सलग दीड किलोमीटरच्या रस्त्याचे फ्रंटेज मिळविण्यासाठी शाळा स्थलांतराचा घाट?
वाकड (Pclive7.com):- भुमकर वस्ती येथे गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेली आणि सुमारे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत असलेली महापालिकेची कै. आबाजी रामभाऊ भूमकर आदर्श शाळा स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभारलेली शाळा अडगळीत ढकलली जात असताना, दुसरीकडे खासगी बांधकाम प्रकल्पाला रस्त्याचे तब्बल एक ते दीड किलोमीटरचे फ्रंटेज उपलब्ध करून देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, प्रस्तावित जागा महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. भुमकर वस्ती येथे सध्या शाळा आणि क्रीडांगणासाठी सुमारे तीन एकर जागा आरक्षित आहे. या आरक्षणाला लागूनच एका बांधकाम व्यावसायिकाचा सुमारे १६ एकरांचा भूखंड आहे. रस्त्यालगत असलेल्या या भूखंडावर व्यावसायिक बांधकामातून मोठा आर्थिक फायदा मिळविण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्याची शाळा या व्यावसायिक आराखड्यात अडथळा ठरत असल्याने शाळा एका कोपऱ्यात हलवून रस्त्यालगतची जागा व्यावसायिक वापरासाठी मोकळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, शाळा स्थलांतराबाबत अधिकृत निर्णय किंवा आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शाळेच्या शेजारील आरक्षित जागेत खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. याशिवाय, संबंधित भूखंडाच्या कडेने महापारेषणचे मोठे विद्युत खांब वळविण्यात आल्याने बांधकामातील एक अडथळा दूर झाल्याची चर्चा आहे. आता शाळेचे स्थलांतर करून उर्वरित जागाही व्यावसायिक प्रकल्पासाठी अनुकूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप होत आहे.
शाळा स्थलांतरित झाल्यास विद्यार्थ्यांना सध्याच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अधिक अंतराचा वळसा मारावा लागणार आहे. परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांसाठी ही शाळा शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यातच प्रस्तावित जागा अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली असल्याने सुरक्षिततेबाबतही पालकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयी, सुरक्षितता आणि शैक्षणिक हितापेक्षा खासगी बांधकाम प्रकल्पाच्या सोयीला प्राधान्य दिले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
विशेष म्हणजे, शाळेसाठी भूमकर कुटुंबाने साडेसहा गुंठे जमीन महापालिकेला विनामोबदला दिली होती. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने दिलेल्या या जमिनीवर गेल्या २६ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडले. मात्र, ज्या कुटुंबाच्या दातृत्वातून शाळा उभी राहिली, त्यांनाच विश्वासात न घेता शाळेच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
एका बाजूला शिक्षणासाठी जमीन देणाऱ्या भूमकर कुटुंबाच्या योगदानाकडे दुर्लक्ष आणि दुसरीकडे बाराशे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णयात त्यांच्या हिताला दुय्यम स्थान, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करून शाळेच्या आरक्षणाचे संरक्षण करावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, याची खात्री द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत महापालिका आयुक्त व नगररचना विभागाचे उपसंचालक यांची प्रतिक्रिया जाणण्यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
केवळ बिल्डरच्या दबावाला बळी पडून महापालिका प्रशासन चुकीचा निर्णय घेत असून त्यामुळे हजारो गरजू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आरक्षण स्थलांतराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसतानाही शाळेच्या जागेतच बिल्डरकडून सॅम्पल फ्लॅट व कार्यालयाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हे कसे काय शक्य आहे?– मोहन भुमकरशाळेसाठी जमीन देणारे शेतकरी, वाकड

















Join Our Whatsapp Group