उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रशानाला कार्यवाहीच्या सूचना
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात आकुर्डी, विठ्ठलवाडीत टाकलेल्या आरक्षणात बदल करावा. तेथे ओपन स्पेसचे आरक्षण टाकावे. त्यामुळे तिथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करता येतील. वारकऱ्यांना मुक्कामासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला भेट देऊन नगरसेवकांच्या प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रभाग क्रमांक १४ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आकुर्डी येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी तळाच्या प्रलंबित प्रश्नाकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, आकुर्डी, विठ्ठलवाडी परिसरात विकास आराखड्यात टाकलेल्या आरक्षणात बदल करावा. या परिसरातील जागांवर ओपन स्पेसचे आरक्षण टाकावे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करता येतील.
वारकऱ्यांसाठी मंडप, पाण्याची सुविधा, शौचालयासह विविध सुविधा निर्माण करता येतील. पालखीत वारकऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. वारकऱ्यांना मुक्कामासाठी जागा अपुरी पडत आहे. भक्तांचा जनसागर उसळत आहे. त्यामुळे येथील जागांवर ओपन स्पेसचे आरक्षण टाकणे गरजेचे आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दरवर्षी आकुर्डी येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी असतो. सध्याची जागा अपुरी पडत असल्याने महापालिकेने मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पालखी तळाचे आरक्षण टाकले आहे. हे आरक्षण बदलून श्री विठ्ठल मंदिर परिसरातीलच आरक्षित जागेवर पालखी तळाचे आरक्षण निश्चित करावे. पालखी तळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण प्रशासनाने लवकरात लवकर काढून घ्यावे, जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय टळेल. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पालखी सोहळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी मंदिर परिसरातच पालखी तळ होणे आवश्यक असल्याचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.


















Join Our Whatsapp Group