पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेणे आणि शहराच्या भविष्यातील गरजांचे नियोजन करणे आवश्यक होते. या उद्देशाने आज महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. शहराच्या विकासासाठी अजितदादांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यांनी या शहरासाठी जितका वेळ दिला, तितका वेळ कदाचित आपल्या कुटुंबालाही दिला नसेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी अजितदादांच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासातील योगदानाला उजाळा दिला.

अजितदादा जेव्हा सुरुवातीला या शहरात आले, तेव्हा पिंपरी-चिंचवडची परिस्थिती वेगळी होती. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. त्यांच्या स्वप्नातील या शहरासमोर आज विविध प्रश्न निर्माण होत असल्याचे ऐकून मनाला वेदना होतात. दुष्काळी परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
अजितदादांच्या शहरातील सर्वपक्षीय नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने मोठ्या अपेक्षा होत्या. पक्ष कोणताही असो, सर्वांनी शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, ही त्यांची इच्छा होती. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबीसाठी ते नेहमी निधी उपलब्ध करून देत असत. आज देशात पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख झाला की अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असेही सुनेत्रावहिनी म्हणाल्या.
पालकमंत्री म्हणून अजितदादांप्रमाणेच माझेही या शहरावर प्रेम आहे. महायुती सरकार आणि मी स्वतः पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. शहरातील सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
मोशी कचरा दुर्घटनेबाबत प्रशासनाला जाब..
मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मोशी येथील दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी कचरा नेणे थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जात आहे, त्याची व्यवस्था काय करण्यात आली आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेतली.
कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे मला अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे. या प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन स्वतः लक्ष घालणार आहे. प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता ते तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
दुष्काळी परिस्थिती आणि स्थलांतराचे नियोजन करा..
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतून नागरिक रोजगार आणि इतर कारणांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक निर्माण होणारा लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.
औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य..
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
आजच्या बैठकीत राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.
पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अजितदादांनी या शहरासाठी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी मी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दिली.

















Join Our Whatsapp Group