पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसराच्या विकासात आधुनिकतेची भर घालत कुणाल आयकॉन रोडवर आकर्षक अँटिक पथदिव्यांची प्रायोगिक उभारणी करण्यात आली आहे. ‘पोस्ट टॉप डेकोरेटिव्ह फिटिंग’ आणि ‘बरीड लाईट्स’ या आधुनिक प्रकाशयोजनेच्या माध्यमातून रस्त्याचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रायोगिक कामाची भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

कुणाल आयकॉन रोडचा विकास वेगाने सुरू असून, या मार्गावरील फुटपाथवर आकर्षक अँटिक पथदिवे बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, तसेच रस्त्याला आकर्षक आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही प्रकाशयोजना उभारण्यात आली असून, तिचा प्रकाशाचा परिणाम, रचना आणि तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पाहणीदरम्यान दिव्यांची रचना, प्रकाशयोजना आणि स्थापत्य कामाचा आढावा घेतला. या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन संपूर्ण मार्गावर अशाच दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनासोबत पुढील नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कुणाल आयकॉन रोडवरील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित, प्रसन्न आणि सुसज्ज वातावरण मिळावे, या उद्देशाने हे अँटिक पथदिवे प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून संपूर्ण परिसरात अशाच दर्जेदार व नाविन्यपूर्ण सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नगरसेविका अनिताताई काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेवक जयनाथशेठ काटे यांनी स्वागत केले. याप्रसंगी विद्युत कार्यकारी अभियंता सचिन नांगरे, उपअभियंता दिपाली धेडे, कनिष्ठ अभियंता गिरीधर कोरे तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
कुणाल आयकॉन रोडवरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण मार्गाला आकर्षक प्रकाशसजावटीचा नवा साज चढणार असून, पिंपळे सौदागरच्या नागरी सौंदर्यात आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















Join Our Whatsapp Group