ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लिंबाळे यांची १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा साहित्यविश्वात गौरव झाला आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या या निवडीबद्दल आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. लिंबाळे हे पिंपरी-चिंचवडचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या निवडीचा आनंद संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी साहित्यविश्वात राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या साहित्यिकाचा शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गौरव होणे, हा पिंपरी-चिंचवडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान असल्याची भावना यावेळी आमदार शंकर जगताप यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून आणि ‘सनातन’सारख्या साहित्यकृतीतून डॉ. लिंबाळे यांनी उपेक्षित समाजाचे वास्तव, जातिभेद आणि सामाजिक विषमता प्रभावीपणे मांडली आहे. दलित साहित्याला व्यापक ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. असेही जगताप यावेळी म्हणाले.
भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांच्याशी साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्यविश्वातील विविध विषयांवर संवाद साधला व त्यांचे मार्गदर्शन घेतले. आजच्या या निवडी मधून शहरातील नवोदित लेखक, साहित्यिक आणि युवा पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















Join Our Whatsapp Group