पिंपरी (Pclive7.com) :- स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळावी, तसेच शहरातील क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने थेरगाव येथील कै. मोरू बारणे क्रीडांगणाचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याचा संकल्प शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी केला आहे. या क्रीडांगणावर ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्याचे नियोजन असून, यामुळे थेरगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यान व कै. मोरू बारणे क्रीडांगणाची नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी क्रीडांगणावर बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, पिकलबॉल कोर्ट, सिंथेटिक रनिंग ट्रॅक तसेच बहुउद्देशीय क्रीडा कोर्ट उभारण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक सरावाची संधी स्थानिक पातळीवरच मिळावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे केवळ क्रीडांगणाचे नूतनीकरण न करता भविष्यातील खेळाडू घडविणारे आधुनिक क्रीडा संकुल विकसित करण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा विश्वजीत बारणे व्यक्त केली.
दरम्यान, लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाचीही पाहणी करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी उद्यानातील आवश्यक सुधारणा आणि नूतनीकरणाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. दोन्ही प्रकल्पांच्या विकासासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना व चर्चा करण्यात आली.
या पाहणीप्रसंगी उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान सहाय्यक (वृक्ष संवर्धन) सिद्धेश्वर कडाळे, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर, उद्यान निरीक्षक प्रसाद रोकडे, विद्युत विभागाचे उपअभियंता शेषेराव शेळके, कनिष्ठ अभियंता पवन दांदळे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, उपअभियंता वंदना मोर आणि कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते उपस्थित होते.
“थेरगावमध्ये जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक खेळाडूंना सरावासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, आगामी काळात शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.”
– विश्वजीत बारणे,गटनेता शिवसेना तथा नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिका

















Join Our Whatsapp Group