पिंपरी (Pclive7.com):- आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोमल डहाळे असे मृत तरुणीचे नाव असून, शुभम ज्ञानेश्वर कालबांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी रात्रभर प्रेयसीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. त्यानंतर सकाळी स्वतःच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल डहाळे आणि शुभम कालबांडे हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. संतापलेल्या शुभमने कोमलच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमलचा मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपी शुभम रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतः पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून प्रेयसीची हत्या केल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभम कालबांडे याला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येने आयटी क्षेत्रातील तरुणांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.


















Join Our Whatsapp Group