पिंपरी (Pclive7.com):- बोपखेल येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त उद्यानाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हे उद्यान नागरिकांसाठी खुले कधी होणार, असा प्रश्न बोपखेलमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उद्यानाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी युवासेनेच्या प्रतीक्षा घुले यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतीक्षा घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोपखेल येथे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत प्रशस्त उद्यान उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, अनेक वर्षे उलटूनही या उद्यानाचे काम पूर्ण झालेले नाही. गेल्या चार ते पाच वर्षांपासून काम सुरू असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्यानाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि नागरिकांना या सुविधेचा लाभ कधी मिळणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसून, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत विषय टाळत असल्याचा आरोपही प्रतीक्षा घुले यांनी केला आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि उद्यानाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून त्याचे लोकार्पण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी दक्षता समिती सदस्य रवि कोवे उपस्थित होते.
















Join Our Whatsapp Group