पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेली विकासकामे, वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत अतिक्रमणे आणि बंद पथदिव्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन एकत्र आले आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे आणि महापालिकेचे नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी संयुक्तपणे परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन संबंधित कामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात नगरसेविका अनिताताई काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेवक जयनाथशेठ काटे उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी, रात्रीच्या वेळी सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांची सद्यस्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोडला गती
कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया या प्रस्तावित डी.पी. रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असून, त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
बंद पथदिवे सुरू करण्याच्या सूचना..
मिलिटरी हद्दीलगत नव्याने सुरू झालेल्या रस्त्याच्या कडेला असलेले बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
कुणाल आयकॉन रोडवर फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि इतर अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. याची गंभीर दखल घेत शत्रुघ्न काटे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने मोहीम राबविण्याचा आग्रह धरला.
पदपथांचे संरक्षण आणि अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यावर भर
पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी कुंपण किंवा सुरक्षा कठडे उभारण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच द्वारका हाइट्सजवळील आर्मी बॅकसाईड रोडवरील सुमारे ३० ते ४० मीटरचा अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “पिंपळे सौदागरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोडचे काम, कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमणे, पदपथांचे संरक्षण आणि मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वयातून ही कामे प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
दरम्यान, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी संबंधित कामांच्या तांत्रिक बाबी तपासून त्यांना गती देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारामुळे पिंपळे सौदागरमधील रस्ते, वाहतूक, प्रकाशयोजना आणि अतिक्रमणांचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

















Join Our Whatsapp Group