पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालंतविडा योजनेअंतर्गत स्तनदा माता आणि नवजात बालिकांसाठी साहित्य पुरवठा करण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेवरून वाद निर्माण झाला आहे. निविदेतील आर्थिक आकडेवारी, तांत्रिक अटी, अनुभवाचे निकष आणि अनामत रकमेबाबत अनेक विसंगती असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निविदेची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाळंतविडा योजना ही माता आणि बालिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची सामाजिक कल्याणकारी योजना आहे. या योजनेतून गरजू लाभार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळण्याबरोबरच स्थानिक महिला बचत गट आणि सूक्ष्म व लघुउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, निविदेतील आर्थिक अटी, अनुभवाची पात्रता, तीन ISO प्रमाणपत्रांची सक्ती आणि मोठ्या आर्थिक तरतुदींमुळे स्थानिक महिला बचत गटांना स्पर्धेत सहभागी होणे कठीण होण्याची शक्यता वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक आकडेवारीतील तफावतीचा खुलासा करा!
निविदा जाहिरातीमध्ये नमूद केलेली १० कोटी ९४ लाख ३४ हजार रुपये आणि १३ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये या दोन रकमांमधील फरक स्पष्ट करण्यात आलेला नाही. सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेचा अंदाज कोणत्या आधारावर तयार करण्यात आला, संबंधित लेखाशीर्षाखाली पुरेशी आर्थिक तरतूद आहे का आणि वस्तुनिहाय बाजारभावांचा विचार करण्यात आला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निविदेच्या कालावधीसह संचसंख्येबाबतही संभ्रम..
निविदा जाहिरातीमध्ये दोन वर्षांचा कालावधी नमूद असताना निविदेतील एका अटीमध्ये तीन वर्षांचा उल्लेख आहे. तसेच ३६ हजार माता संच आणि १७ हजार बालिका संच ही संख्या वार्षिक आहे की संपूर्ण निविदा कालावधीसाठी, याबाबत स्पष्टता नसल्याने निविदादारांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो, असे वाघेरे यांनी निदर्शनास आणून दिले.
मोठ्या आर्थिक अटींमुळे महिला बचत गटांना फटका?
निविदेत बयाणा रक्कम, अनामत रक्कम आणि निविदा शुल्काबाबत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अनामत रकमेसाठी ५ टक्के आणि ३ टक्के अशा दोन वेगवेगळ्या अटी नमूद असल्याने नेमकी कोणती अट लागू आहे, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुमारे २४.८० लाख रुपये बयाणा रक्कम आणि १.२४ कोटी रुपये अनामत रक्कम यांसारख्या मोठ्या आर्थिक अटींमुळे स्थानिक महिला बचत गट आणि लघुउद्योजक निविदा प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांना लागू असलेल्या शासकीय सवलतींची अंमलबजावणी झाली आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
अनुभव आणि ISO प्रमाणपत्रांच्या अटींवर आक्षेप..
निविदेसाठी १५० लाख रुपयांच्या अनुभवाची अट कोणत्या कालावधीसाठी लागू आहे, तत्सम शासकीय साहित्य पुरवठ्याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे का आणि तीन ISO प्रमाणपत्रे अनिवार्य करण्यामागील नेमके कारण काय, असे प्रश्न वाघेरे यांनी उपस्थित केले आहेत. साहित्याच्या नमुन्यांची तपासणी कोणत्या प्रयोगशाळेत होणार, त्या प्रयोगशाळेला NABL मान्यता आहे का आणि तपासणीसाठी ३० हजार रुपये शुल्क आकारण्याचा आधार काय, याचाही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
साहित्य वितरण आणि अन्नसुरक्षेची जबाबदारी निश्चित करा..
पुरवठा केलेले साहित्य वायसीएम रुग्णालयाच्या भांडारात जमा करायचे की पुरवठादाराने थेट लाभार्थ्यांना वितरित करायचे, याबाबत निविदेत स्पष्टता नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, पॅकिंग, मुदत समाप्ती तारीख, वाहतूक आणि वितरणाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. याशिवाय लाभार्थ्यांची पात्रता, उत्पन्न मर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि नवजात बालकांच्या समावेशाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वतंत्र चौकशी करून सुधारित निविदा प्रसिद्ध करा..
निविदा तयार करणाऱ्या विभागापासून स्वतंत्र अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी. निविदेचे मूळ अंदाजपत्रक, वस्तुनिहाय दर, मागील तीन वर्षांतील प्रसूती व लाभार्थ्यांची संख्या, प्रयोगशाळेचे दरपत्रक, गुणवत्ता तपासणी अहवाल, निविदा समितीचा अहवाल आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. निविदेतील सर्व अटींचे पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा अधिकृत शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध कराव्यात. मूलभूत त्रुटी आढळल्यास नियमानुसार निविदा रद्द करून सुधारित अटींसह नव्याने निविदा प्रसिद्ध करावी. नव्या निविदेसाठी किमान २१ दिवसांचा कालावधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
योजनेला विरोध नाही, पारदर्शक अंमलबजावणी हवी!
बाळंतविडा योजनेला किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराला आपला विरोध नाही. गरजू माता आणि बालिकांना दर्जेदार साहित्य मिळावे, स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि महापालिकेच्या सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग व्हावा, हीच आपली भूमिका असल्याचे संदीप वाघेरे यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित ठेवावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Tags: Sandeep Waghere

















Join Our Whatsapp Group