पुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील छत्रपती शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. चौघा हल्लेखोरांनी एका तरुणावर दोन पिस्तुलांतून गोळीबार केला. मात्र, गोळ्या लक्ष्यावर न लागल्याने हल्लेखोरांनी कोयते काढून तरुणावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा हात तुटल्याची माहिती आहे. बुधवारी (दि.२५ नोव्हेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

छत्रपती शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू असल्याने परिसरात वकील, पक्षकार आणि नागरिकांची मोठी गर्दी होती. त्याचवेळी मेट्रो स्थानकाजवळ अचानक गोळीबाराचा आवाज झाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. वकील आणि नागरिकांची धावपळ सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चौघा हल्लेखोरांनी तरुणावर दोन पिस्तुलांतून गोळीबार केला. मात्र, गोळ्या न लागल्याने त्यांनी जवळील कोयते बाहेर काढले. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी पळत असलेल्या तरुणाला त्यांनी फुटपाथवर अडवले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा हात तुटल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला सोडून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. न्यायालयासारख्या वर्दळीच्या परिसरात भरदिवसा गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण काय, जखमी तरुणाची ओळख काय आणि हल्लेखोर कोण आहेत, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

















Join Our Whatsapp Group