अवजड वाहनांची वाहतूक, बांधकाम परवानग्या आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर; प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याची मागणी
वाकड (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ मधील पार्क स्ट्रीट सोसायटीतील नागरिकांच्या विविध गंभीर समस्यांबाबत आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी सोसायटीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसह बांधकाम परवानग्या, अवजड वाहनांची वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.

पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या परिसरात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २२ नोव्हेंबर रोजी नागरिकांनी मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त केली होती. या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनीही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी आयुक्तांसमोर विविध मुद्दे मांडले. यामध्ये क्लब हाऊसऐवजी शाळेची उभारणी आणि मंजूर बांधकाम आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची चौकशी, सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या आरएमसी प्लांटच्या परवानग्यांची तपासणी, सोसायटीची कंपाउंड वॉल पाडून तयार करण्यात आलेल्या प्रवेशमार्गाची कायदेशीरता तपासणे, डंपर आणि आरएमसी बल्कर यांसारख्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालणे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
तसेच, Wisdom School आणि प्रस्तावित RAYA प्रकल्पामुळे भविष्यात परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही समस्या टाळण्यासाठी RAYA प्रकल्पाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग पार्क स्ट्रीट सर्कलपासून दूर, ४५ मीटर औंध-रावेत बीआरटी मुख्य रस्त्याच्या बाजूला योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक संदीप कस्पटे, पार्क स्ट्रीट सोसायटीच्या ॲपेक्स कमिटीचे पदाधिकारी, शिष्टमंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या सर्व विषयांवर आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे, पर्यावरणविषयक बाबी आणि वाहतूक नियोजनाची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करून चौकशीअंती केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची विनंतीही करण्यात आली.
पार्क स्ट्रीट सोसायटीतील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत हक्क यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या रास्त मागण्यांसाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी भूमिका नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली.

















Join Our Whatsapp Group