कृष्णानगर ते साने चौकापर्यंत सांडपाण्याचा प्रवाह; दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, तक्रारीनंतरही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी (Pclive7.com) :- कृष्णानगर येथील संविधान चौकात ड्रेनेज चेंबर चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. कृष्णानगर चौकापासून साने चौकापर्यंत सांडपाण्याचा प्रवाह सुरू असल्याने परिसरात अस्वच्छतेचे आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या या समस्येमुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या समस्येबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी केला आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार तक्रार करूनही समस्या सोडवली जात नसेल, तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची?” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
महापालिका प्रशासनाने तातडीने ड्रेनेज चेंबरमधील चोकअप दूर करून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी थांबवावे. तसेच परिसराची स्वच्छता करून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group