पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक कारभारात प्रशासकीय नियम आणि निर्धारित प्रक्रियेला बगल देऊन तब्बल ६० कोटी १८ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या तथा महापालिका नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नगरसचिव विभागामार्फत उपसूचना सादर करण्याची प्रक्रिया टाळून थेट लेखा विभागाकडे १७ उपसूचना सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापैकी १४ उपसूचनांशी संबंधित ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची देयके अदा झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या वर्ष २०२५-२६ च्या सुधारित आणि वर्ष २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकाला २४ मार्च २०२६ रोजी महापालिका सभेची अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर काही नगरसेवकांनी नगरसचिव विभागामार्फत उपसूचना सादर करण्याची निर्धारित प्रशासकीय प्रक्रिया न पाळता थेट लेखा विभागाकडे १७ उपसूचना सादर केल्याचे समोर आले आहे. या उपसूचनांपैकी १४ उपसूचनांवरील देयके अदा करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही देयके अदा करण्याची कार्यवाही ३१ मार्च २०२६ रोजी झाल्याचे नमूद आहे.
अवघ्या काही दिवसांत एवढ्या मोठ्या रकमेची देयके अदा करण्याची घाई नेमकी कशासाठी करण्यात आली? नगरसचिव विभागाला डावलून थेट लेखा विभागाने या उपसूचना कशा स्वीकारल्या? त्यांची छाननी कोणी केली? त्यांना कोणत्या अधिकाराने मान्यता देण्यात आली? तसेच ६० कोटी रुपयांची देयके अदा करताना कोणत्या नियमांचा आधार घेण्यात आला? असे सवाल उबाळे यांनी उपस्थित केले आहेत.
या कामांची प्रत्यक्ष आवश्यकता काय होती, कामे पूर्ण झाली आहेत का, त्यांचा लाभ कोणाला झाला आणि संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका होती, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
कंत्राटदारांची भूमिकाही तपासा!
या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि ठेकेदारांची भूमिकाही तपासण्याची मागणी उबाळे यांनी केली आहे. ज्या कामांसाठी उपसूचना सादर करण्यात आल्या, त्या कामांची प्रत्यक्ष स्थिती काय होती? कंत्राटदारांनी कोणत्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे बिले सादर केली? उपसूचनांना नियमानुसार मंजुरी मिळण्यापूर्वीच कामे करण्यात आली होती का? नियमबाह्य पद्धतीने बिले सादर करण्यामागे कोणाचे पाठबळ होते? या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचा निधी हा कोणत्याही पक्षाचा किंवा पदाधिकाऱ्याचा वैयक्तिक निधी नसून करदात्या नागरिकांच्या पैशातून जमा झालेला सार्वजनिक निधी आहे. त्यामुळे या निधीचा वापर करताना नियम, पारदर्शकता आणि जनहित यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. सार्वजनिक पैशांच्या व्यवहारात मनमानी खपवून घेतली जाणार नाही. सत्ताधारी असोत किंवा प्रशासनातील अधिकारी, कोणालाही नियमांपेक्षा मोठे होता येणार नाही. या प्रकरणातील प्रत्येक निर्णयाची आणि प्रत्येक सहीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे उबाळे यांनी सांगितले.
सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी..
या प्रकरणातील सर्व १७ उपसूचनांच्या प्रती, त्यावरील मंजुरीचे आदेश, संबंधित कामांची माहिती, देयकांची तपशीलवार यादी आणि देयके अदा करण्यास मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सार्वजनिक करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य व्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या पैशांचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे. लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारणे हा जनतेचा अधिकार आहे आणि हा अधिकार आम्ही बजावत राहणार आहोत, असा इशाराही शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

















Join Our Whatsapp Group