पिंपरी (Pclive7.com):- युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ‘रणभूमी 2.0 – इंटर कॉलेज एरा ऑफ कॉन्क्वेस्ट’ ही आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या ७, ८ आणि ९ डिसेंबर २०२६ रोजी रंगणार आहे. IIEBM – इंडस बिझनेस स्कूल, पुणे यांच्या वतीने पुनावळे येथील ९ स्पोर्ट्स अरेना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेत २० हून अधिक महाविद्यालयांतील संघ सहभागी होण्याची अपेक्षा असून, क्रिकेटप्रेमींना तीन दिवस क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे.

रणभूमीच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. मागील वर्षी उत्कृष्ट सामने, खेळाडूंची दमदार कामगिरी आणि भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यामुळे ही स्पर्धा चर्चेत आली होती. विशेषतः KTM मोटरसायकल हे पहिल्या पर्वातील आकर्षण ठरले होते. याच यशस्वी परंपरेला पुढे नेत यंदा ३ लाख रुपयांहून अधिक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि सामनावीर अशा वैयक्तिक पुरस्कारांनी खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.
यंदाच्या स्पर्धेची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली वारशावर आधारित आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची नावे विविध संघांना देण्यात येणार असून, शौर्य, धैर्य, रणनीती आणि जिद्दीचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांच्या नावाने संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक क्रीडास्पर्धेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
दमदार षटकार, अचूक गोलंदाजी, महत्त्वपूर्ण बळी आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारी चुरस यामुळे रणभूमी 2.0 स्पर्धेत क्रिकेटचा रोमांच अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण करण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या स्पर्धेसाठी पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालये तसेच क्रिकेट संघांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक संघांनी https://forms.gle/ Zt3CsePiYDTw5mYJ9 या लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी Instagram वरील @iiebm_rannbhoomi आणि @iiebm_pune या अधिकृत पेजेसना भेट द्यावी किंवा ८१४९०९३७८० या क्रमांकावर संपर्क साधावा.


















Join Our Whatsapp Group