पिंपरी (Pclive7.com):- शहराचे ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निगडीतील दुर्गादेवी टेकडीवरील २२७ पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची तोड करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. पाण्याची टाकी आणि जलवाहिनी टाकण्यासाठी या वृक्षांची कत्तल करण्याचे नियोजन करण्यात आले असून, उद्यान विभागाकडून झाडांवर वृक्षतोडीच्या नोटिसा लावण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिकांनी दुर्गादेवी टेकडीवर एकत्र येत झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले. पर्यायी मोकळ्या जागेचा विचार न करता थेट पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेणे म्हणजे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
महापालिकेच्या उद्यान विभागाने या वृक्षतोडीबाबत नागरिकांना १ डिसेंबर रोजी हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हा केवळ कायदेशीर औपचारिकतेचा भाग असल्याची शंका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे १ डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षतोडीच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
दुर्गादेवी टेकडी ही शहरासाठी महत्त्वाची हरित संपत्ती असून, येथील वृक्षसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे पाण्याच्या टाकीसाठी आणि जलवाहिनीसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, मात्र कोणत्याही परिस्थितीत २२७ वृक्षांची कत्तल करू नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. आता महापालिका प्रशासन या जनभावनेची दखल घेऊन वृक्षतोडीचा निर्णय बदलणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group