पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.२६) दिघी येथील रामचंद्र गायकवाड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ!’ या विषयावर आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकशाही, भारतीय संविधान आणि युवकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक उदयभाऊ गायकवाड, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वाळके सर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेशभाऊ यादव, सरचिटणीस राजेशभाऊ डोंगरे, मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य इंद्रजीत भोसले आणि प्रमुख वक्ते प्रा. नितीन साळी उपस्थित होते.
यावेळी प्रा. नितीन साळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिर्मितीमधील युवकांचे योगदान यावर सविस्तर विवेचन केले.
लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाच्या विचारांत, आचरणात आणि जबाबदारीच्या जाणिवेतून जिवंत राहते. संविधानाचा सन्मान करणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस उदय गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तरुण पिढीमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची रुजवण करणे आणि राष्ट्राच्या विकासात युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


















Join Our Whatsapp Group