पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरण परिसरातील दुर्गादेवी टेकडीवर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामासाठी २२७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणाच्या दृष्टीने या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन प्रकल्पासाठी योग्य पर्यायी जागेचा विचार करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

दुर्गादेवी टेकडी परिसर हा निगडी प्राधिकरणमधील नागरिकांसाठी महत्त्वाचा हरित परिसर आहे. अनेक वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा विकसित झाली असून, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि निसर्गप्रेमी नागरिक दररोज व्यायाम व विरंगुळ्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या परिसरातील वृक्षसंपत्तीचे जतन करण्याबाबत नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. हा मुद्दा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी विकासकाम करताना पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पासाठी टेकडी परिसरातील किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध असलेल्या पर्यायी जागांची शक्यता तपासावी, अशी सूचना त्यांनी केली.
या प्रकल्पाबाबत उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रितपणे पाहणी करून व्यवहार्य पर्याय निश्चित करावेत. तसेच वृक्षतोडीची आवश्यकता, त्याचे पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम आणि उपलब्ध पर्यायी जागांचा सविस्तर अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणीही उपमहापौर बाबर यांनी केली.
दुर्गादेवी टेकडीच्या विषयावर नागरिकांकडून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचवून या प्रश्नावर सकारात्मक मार्ग निघावा, यासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या हिताचा आणि शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी योग्य तो पर्याय निश्चित करावा, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले.


















Join Our Whatsapp Group