पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमी संघाने पटकावले. अंतिम सामन्यात व्हेरॉक संघाने क्रिक फिटनेट ॲकॅडमीचा तब्बल ९२ धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला. निकीता सिंग हिची ६८ धावांची आक्रमक खेळी आणि सृष्टी यादव हिच्या प्रभावी गोलंदाजीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

रावेत येथील चॅम्पियन्स एरिना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीने निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १६३ धावा केल्या. निकीता सिंग हिने अवघ्या ४१ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६८ धावांची शानदार खेळी केली. मेहक मुल्ला हिने ४८ चेंडूंत ५१ धावांचे योगदान देत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली.
१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिक फिटनेट ॲकॅडमीचा संपूर्ण संघ १३.२ षटकांत अवघ्या ७१ धावांवर बाद झाला. नाव्या दुबे (२२) आणि राशी व्यास (२१) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हेरॉकच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. सृष्टी यादव हिने १५ धावांत चार बळी घेतले. पर्णवी गाढवे हिने तीन, तर आराध्या सिंग हिने दोन गडी बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान निकीता सिंग हिला देण्यात आला.
स्कोअर स्पोर्ट्सला तृतीय क्रमांक..
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीने मॅव्हरीक्स ॲकॅडमीचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मॅव्हरीक्स संघाने १७ षटकांत पाच गडी गमावून ९६ धावा केल्या. आर्या वर्मा हिने नाबाद ४४, तर अस्मि खडरकर हिने नाबाद २७ धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कोअर स्पोर्ट्सने १३.२ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात ९७ धावा करून विजय मिळवला. समीक्ष्या पवार हिने नाबाद ४८, तर आर्या चिखलीकर हिने नाबाद २७ धावा केल्या. या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आर्या चिखलीकर हिला देण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण..
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतुल सोनिग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव डॉ. दिलीप सिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे यांच्यासह आनंद नायडू, अरुण जागडे, सुशील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
विजेत्या व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमी संघाला १५ हजार रुपये आणि करंडक, उपविजेत्या क्रिक फिटनेट ॲकॅडमीला १० हजार रुपये आणि करंडक, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीला पाच हजार रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.
पालकांनी मुलांच्या नैसर्गिक खेळाला प्रोत्साहन द्यावे – मिलिंद कुलकर्णी
पारितोषिक वितरण समारंभात बोलताना माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या पाल्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्यातील नैसर्गिक खेळ बहरण्यास संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. खेळाडूंच्या खेळात अनावश्यक हस्तक्षेप करू नये. प्रशिक्षकांशी सातत्याने संपर्क आणि समन्वय ठेवावा. मुलांवर अनावश्यक मानसिक दडपण आणणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य पालकांनी करू नये, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.


















Join Our Whatsapp Group