पिंपरी (Pclive7.com):- बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयाशेजारी उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेचे अनावरण आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना संविधान पालनाची शपथ देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले की, भारतीय संविधानामुळे समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण झाली आहे. संविधानामुळेच भारतीय नागरिकांना समान अधिकार प्राप्त झाले असून, देशातील सामान्य माणूसही लोकशाही व्यवस्थेत सन्मानाने उभा राहिला आहे. भारतीय संविधान, भाषा आणि साहित्य यांच्यातील परस्परसंबंधांवरही त्यांनी आपले विचार मांडले.
स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानचे संदेश नवले यांनी मनोगत व्यक्त करताना, भारतीय संविधानाने माणसे जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि शैक्षणिक नीतिमूल्ये याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एल. राठोड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र भाईवार यांनी केले, तर प्रा. नेहा बवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला निखिल भोईर, युनूस बागवान, प्रतीक नवले यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group