पिंपरी (Pclive7.com) : गुजरातमधील अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय कुडो स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. विविध वयोगटांत उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पाच खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत शहराच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.

या स्पर्धेत वैष्णवी घाडगे (८ वर्षांखालील, १८ किलोखालील), आद्या आर्या (११ वर्षांखालील, ३३ किलोखालील), पर्णिका केंजाळे (११ वर्षांखालील, २७ किलोखालील), श्रेया सावंत (१४ वर्षांखालील, ४६ किलोखालील) आणि पार्थ पंजाबी (१९ ते २१ वर्षे वयोगट, -२७० पी.आय.) यांनी आपल्या गटांत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला तो पार्थ पंजाबी. त्याने राष्ट्रीय कुडो स्पर्धा, अक्षय कुमार आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धा आणि कुडो फेडरेशन कप अशा तीन प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना कुडो प्रशिक्षक कोच राकेश यादव यांचे प्रशिक्षण, तर रेन्शी अरविंद मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी केलेला नियमित सराव, शिस्त, कठोर परिश्रम आणि जिद्द यासोबतच पालकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे हे यश शक्य झाले.
पिंपरी-चिंचवडच्या या कुडोपटूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे शहरातील नवोदित खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करण्याची प्रेरणा मिळणार आहे.


















Join Our Whatsapp Group