पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर क्र.२३ येथील दुर्गादेवी उद्यान टेकडीवर प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या कामासाठी तब्बल २७५ झाडांची तोड करण्यात येणार असल्याच्या निर्णयाला माजी उपमहापौर तथा नगरसेवक राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला आहे. या वृक्षतोडीचा निर्णय तातडीने स्थगित करून पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दुर्गादेवी उद्यान टेकडी हा केवळ मोकळा परिसर नसून शहराच्या पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हरित पट्टा आहे. येथील वृक्षसंपदा, नैसर्गिक हिरवळ आणि मोकळ्या जागेमुळे नागरिकांना स्वच्छ हवा व आरोग्यदायी वातावरण मिळते. अशा महत्त्वपूर्ण परिसरातील २७५ झाडांची तोड झाल्यास पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मिसाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पाणीपुरवठा हा नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित महत्त्वाचा विषय असून शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास आपला विरोध नाही. मात्र, विकासकामे करताना नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. शहरात वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि कमी होत चाललेली वृक्षसंपदा ही गंभीर आव्हाने असताना शेकडो झाडांची तोड करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर प्रस्तावित पाण्याच्या टाकीसाठी परिसरातील पर्यायी जागांची तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर पाहणी करून योग्य जागा निश्चित करावी. तसेच वृक्षतोडीची कार्यवाही तातडीने स्थगित ठेवावी, प्रकल्पाची आवश्यकता, तांत्रिक आराखडा, वृक्षतोडीची कारणे आणि संबंधित विभागांच्या परवानग्यांची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय वृक्षतोडीसाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली आहे का, वृक्षगणना आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे का, याची माहिती द्यावी. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
“विकासाला विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको!” अशी भूमिका मांडत, पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण करतानाच शहराची नैसर्गिक संपत्तीही सुरक्षित राहिली पाहिजे. पर्यायी जागा उपलब्ध असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे टाळावे आणि दुर्गादेवी टेकडीच्या पर्यावरणाचे संरक्षण करणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन राजू मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाला केले आहे.

















Join Our Whatsapp Group