प्रभाग क्र.११ मधील डांबरीकरणाची तांत्रिक चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; मारुती जाधव यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील स्पाईन रोडवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा अवघ्या दोन दिवसांतच उघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती गणपत जाधव यांनी केला आहे. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर हाताने उखडत असल्याचा दावा करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच रस्त्यावरील डांबर हाताने निघत असल्याचे निदर्शनास आल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उद्घाटनाचा गाजावाजा, मात्र कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?
जनतेच्या करातून खर्च होणाऱ्या निधीतून रस्त्यांची कामे केली जात असताना ती टिकाऊ आणि दर्जेदार असणे अपेक्षित आहे. मात्र, डांबरीकरणानंतर अवघ्या दोन दिवसांतच रस्त्यावरील डांबर उखडत असेल, तर संबंधित कामात वापरण्यात आलेले साहित्य, डांबरीकरणाची पद्धत आणि गुणवत्ता तपासणी याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध पुरस्कार मिळत असताना प्रत्यक्ष विकासकामांची गुणवत्ता मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याची टीकाही त्यांनी केली. महापालिकेला पुरस्कार मिळतात; मात्र नागरिकांना हाताने उखडणारे रस्ते मिळत असतील, तर या पुरस्कारांचा प्रत्यक्ष विकासाशी काय संबंध, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी..
स्पाईन रोडवरील डांबरीकरणाच्या कामाची सखोल तांत्रिक चौकशी करावी, संबंधित कामाचे गुणवत्ता परीक्षण करावे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करावी. तसेच निकृष्ट कामाची दुरुस्ती ठेकेदाराच्या खर्चातून करून घ्यावी आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अशीही मागणी त्यांनी केली.
“उद्घाटनाच्या वेळी श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्यांनी आता कामाच्या दर्जाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. जनतेला उद्घाटनाचे नारळ नकोत, तर टिकाऊ रस्ते हवेत. फोटोसेशन नव्हे, तर गुणवत्तापूर्ण विकास हवा,” असे मारुती गणपत जाधव यांनी स्पष्ट केले. आता या आरोपांची महापालिका प्रशासन कितपत दखल घेते आणि संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group