पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातील एटीएस सेंटरमध्ये वाहनांच्या पासिंगसाठी कथितपणे पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष तथा कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. या कथित भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी डॉ. कांबळे यांनी थेट नारळाचा हार घेऊन एटीएस सेंटरवर धडक दिली. पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या गळ्यात नारळाचा हार घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आरटीओ कार्यालयात वाहनांच्या पासिंगसाठी ‘एक नारळ म्हणजे एक हजार रुपये’ असा कोडवर्ड वापरला जात असल्याचा दावा डॉ. कांबळे यांनी केला. वाहनांच्या प्रकारानुसार एक, दोन, तीन किंवा चार नारळांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
या कथित प्रकाराविरोधात २३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे दिल्यानंतर ब्रेक व फिटनेसच्या त्रुटी असलेल्या वाहनांनाही पासिंग दिले जाते, तर सर्व निकष पूर्ण करणाऱ्या वाहनचालकांनी पैसे न दिल्यास त्यांच्या गाड्या जाणीवपूर्वक फेल केल्या जातात, अशा शेकडो तक्रारी आपल्याकडे आल्याचे कांबळे यांनी सांगितले. यासंदर्भात आरटीओतील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी नारळाच्या हारासह एटीएस सेंटरवर जाऊन निषेध नोंदवला.
मुंबईत बैठक घेऊन गाड्यांचे ‘रेट’ ठरवणारा नेता कोण?
या कथित भ्रष्टाचारामागे एका बड्या राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोपही डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. शहरातील आमदार किंवा मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या एका राजकीय पुढाऱ्याने मुंबईत बैठक घेऊन वाहनांच्या पासिंगचे दर निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा सखोल शोध घेऊन या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही जाब विचारणार
या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत लवकरच पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्याकडेही नारळाचा हार घेऊन जाणार असल्याचे कांबळे यांनी जाहीर केले. वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
आरटीओमधील काही अधिकारी वसुली करताना वरिष्ठ अधिकारी, परिवहन मंत्री तसेच शहरातील एका बड्या राजकीय नेत्याला पैसे द्यावे लागत असल्याचे सांगत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
वाहनचालकांची आर्थिक लूट थांबवून आरटीओतील कथित भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाणार असून, हा प्रकार कायमचा मोडून काढण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा इशारा डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group