खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश; थेरगाव फाट्याकडील ग्रेड सेपरेटरच्या विस्ताराचा मार्ग मोकळा
थेरगाव (Pclive7.com):- थेरगाव येथील डांगे चौकातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. डांगे चौकातील अस्तित्वात असलेल्या ग्रेड सेपरेटरची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ७१ कोटी ३९ लाख ८४ हजार १०६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

थेरगावमधील डांगे चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक आहे. या चौकातून हिंजवडी आयटी पार्क, पुणे तसेच शहरातील विविध भागांकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीमुळे कामावर पोहोचण्यास विलंब होत आहे.
या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे ग्रेड सेपरेटरची लांबी वाढविण्याची मागणी केली होती. तसेच थेरगाव गावठाणाकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला होता.
डांगे चौकातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढविल्यामुळे चौकातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच थेरगाव फाटा आणि गावठाण परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. या कामासाठी महापालिकेने आता ७१ कोटी ३९ लाख ८४ हजार १०६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केल्याने प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
या प्रकल्पामुळे डांगे चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, थेरगाव परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.

















Join Our Whatsapp Group