पिंपरी प्रभाग २१ मधील उद्यानांची दुरवस्था; प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील उद्यानांची गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच, सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याने उद्यान परिसरात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा वावर वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही उद्यान विभाग आणि सुरक्षा यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “ठेकेदार उपलब्ध नाही” किंवा “निविदा प्रक्रिया सुरू नाही” अशी असमाधानकारक कारणे दिली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी डब्बू आसवानी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. “जर प्रशासनाला उद्यानांची देखभाल आणि सुरक्षा करणे शक्य नसेल, तर ती उद्याने तात्काळ बंद करावीत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, त्यांनी आयुक्तांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. “महानगरपालिका उड्डाणपुलांवरील विद्युत रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू शकते, पण लहान मुलांच्या उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्यासाठी निधी नसणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.



















Join Our Whatsapp Group