पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून पिंपरी चिंचवड पोलिस देखील तयारीला लागले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३३ किंवा त्यापेक्षाही जास्त मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित लोकसभेचे बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांचा भाग येतो. दिघीमध्ये पुणे आणि हिंजवडीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा काहीसा भाग येतो. या दोन्ही मतदारसंघांचे मतदान २३ एप्रिलला होणार आहे, तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १ हजार ६७१ बूथ असणार आहेत. पोलिसांनी या सर्व मतदान केंद्रांचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे. यामध्ये मागील निवडणुकीदरम्यान ज्या बूथवर हाणामारी किंवा अन्य अनुचित प्रकार घडले आहेत, अशा ३३ मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. या मतदान केंद्रांवर इतर केंद्रांच्या तुलनेत जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
शहरातील राजकीय परिस्थितीचा देखील पोलिसांनी आढावा घेतला आहे. यामध्ये राजकीय वादातून दखलपात्र आणि अदखलपात्र असे दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. या व्यतिरिक्त एक किंवा त्यापेक्षा जास्त बूथ असलेल्या मतदान केंद्राची देखील माहिती गोळा करण्यात आली आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेषतः झोपडपट्टी भागातील बूथवर विशेष लक्ष देणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली; तसेच, निवडणूक विभागाकडूनही काही बूथची चाचपणी सुरू आहे. निवडणूक विभागाकडूनही संवेदनशील बूथची माहिती पोलिसांकडे येऊ शकते. त्यामुळे संवेदनशील बूथ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परवानाधारकांनादेखील पिस्तूल बाळगण्यास मनाई
१० मार्च २०१९ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची तारीख जशजशी जवळ येऊ लागली, तसतसे राजकीय वातावरण पेटू लागले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर टीकेची राळ उडवू लागले आहेत. वैयक्तिक टीका करीत असताना, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याची दाट शक्यता असते. अशा वादांमध्ये पिस्तुलाचा वापर झाल्यास मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिस्तूल परवाना असणार्यांनादेखील शस्त्र बाळगण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यानुसार शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.