चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामांमध्ये ठेकेदारांनी रिंग केली असून संबंधित कामे रद्द करून फेरनिविदा काढण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना यासंदर्भात नाना काटे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामे करण्यासाठी मार्च २०२४ मध्ये निविदा झाली असून त्याच वेळी याची प्रक्रिया अर्धवट केली असून आज पर्यंत कुठल्याही कामाबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. मामुर्डी सांगवडे या ठिकाणी असणाऱ्या पुलाबाबत तर ए.आर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारासाठी संपूर्ण कागदपत्रे घेऊन ए.आर कन्स्ट्रक्शन व टी अँड टी इन्फ्रा. लि. या दोन ठेकेदारांना पात्र करून नेहमी काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना अपात्र केले आहे. या पुलाचे काम ए.आर कन्स्ट्रक्शन यांना मिळणार असून हे आपणांस टेंडर पाकीट क्र.२ उघडण्यापूर्वीच सांगत आहे. त्यामुळे हे काम रद्द करून या कामात अपात्र ठेकेदारांना कायमस्वरूपी अपात्र करून कामाचे टेंडर पुन्हा करावे. महानगरपालिकेकडे नेहमी काम करणारे ठेकेदार ठराविक कामात अपात्र होत असतील तर त्यांना कायमस्वरूपी अपात्र करावे.
सदर कामांच्या निविदा उघडल्या नसून त्यापूर्वीच रद्द करण्याची व फेर निविदा करण्याची मागणी नाना काटे यांनी केली आहे. कागदपत्रे देण्याची ठराविक मुदत असताना ३ महिने कामाबाबत निर्णय घेतला जात नाही तर अशी सर्व कामे रद्द करून पुन्हा टेंडर काढावे व नवीन वर्क ऑर्डर देण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.
Tags: चिंचवड विधानसभानाना काटेपिंपरी चिंचवड महापालिकामहापालिका कामांमध्ये ठेकेदारांची रिंगमाजी विरोधी पक्षनेता























Join Our Whatsapp Group