पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात लीनिअर गार्डनजवळ सोमवारी रात्री एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक पेट घेतली. काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी तत्काळ त्या मार्गावरील वाहतूक बंद केली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.




















Join Our Whatsapp Group