
पिंपरी (Pclive7.com):- होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी ऋषिकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. १६ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला आहे. आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादीच्या होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केली.

तसेच, आरोपीने काही अश्लील वेबसाइट्सवर फोटो अपलोड केल्याचे सांगून ते हटवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असा दबाव टाकला. यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आरोपी ऋषिकेश भाऊसाहेब शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या ऑनलाइन ब्लॅकमेलिंगच्या घटनांपासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारची धमकी मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.




















Join Our Whatsapp Group