– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय चित्रपटसृष्टीत ‘त्सुनामी’ आणणाऱ्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’ सिनेमाचे यश जितके दिमाखदार आहे, तितकेच ते मराठी सिनेसृष्टीसाठी अस्वस्थ करणारे आहे. सिनेविश्वाचे संपूर्ण अर्थकारण ढवळून काढणाऱ्या ‘धुरंधर’सारख्या बिगबजेट, मल्टीस्टार सिनेमांपासून मराठी चित्रपटांना सध्याच्या आणि भविष्यातही होणाऱ्या गंभीर धोक्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण तशी वेळ आली आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक’वर आधारित सुपरहीट ‘उरी’ सिनेमा दिलेल्या आदित्य धर यांच्यावरच भव्य-दिव्य अशा ‘धुरंधर’ची मोठी जबाबदारी टाकण्यात आली. या सिनेमाच्या निर्मितीप्रक्रियेत ‘जिओ’ कंपनीबरोबरच इतरही प्रभावी आर्थिक घटक आहेत. त्यामुळे ‘धुरंधर’साठी अब्जावधींची गुंतवणूक झाल्याचे आणि सत्ताधाऱ्यांचे, शासकीय यंत्रणेचे पुरेसे पाठबळ ‘धुरंधर’ला मिळाल्याचे उघडपणे दिसून येते.

अलीकडच्या काळात सलग अपयशी सिनेमे देणारा, ‘पडेल अभिनेता’ म्हणून शिक्का बसलेला रणबीर सिंग ‘धुरंधर’चा नायक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो पुन्हा प्रकाशझोतात आला. संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जून रामपाल, राकेश बेदी हे त्याचे सहकलाकार सिनेमात सर्वाधिक भाव खाऊन गेले.
‘धुरंधर’च्या छप्परफाड यशाचे सगळे श्रेय आदित्य धर यांच्याच खात्यात जमा झाले. ‘धुरंधर’चा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पूर्वप्रसिध्दीही दणक्यात झाल्याने ‘धुरंधर’ प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. त्याआधी अतिमहागडे ‘paid priviews show’ सुध्दा हाऊसफुल्ल झाले. हिंसेचा अतिरेक असलेले ‘धुरंधर १’ आणि ‘धुरंधर २’ हे दोन्ही सिनेमे साडेतीन ते चार तासांच्या कालावधीचे आहेत. जेमतेम तीन-चार महिन्यांच्या अंतराने ते प्रदर्शित झाले.

दोन्ही वेळी ‘धुरंधर’ने प्रत्येक सिनेमागृहातील जास्तीत जास्त स्क्रीन व्यापून टाकल्या. ३०० ते १५०० रूपयांपर्यंत तिकिट दर होता. एकेका मल्टीप्लेक्समध्ये ३५-४० शो होत होते. मध्यरात्री बारानंतर पहिला शो सुरू होत होता. रात्री उशिराही ‘धुरंधर’चे शो होत होते. तशीच परिस्थिती अनुभवणाऱ्या एकपडदा सिनेमागृहांचीही यानिमित्ताने भलतीच चांदी झाली. कित्येक आठवडे ‘धुरंधर’ने सिनेमागृहांमध्ये एकतर्फी व्यवसाय केला. लाखोंच्या संख्येत प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये ‘धुरंधर’साठी रांगा लागल्याचे चित्र होते. ‘धुरंधर’ आवर्जून पाहणाऱ्यांमध्ये हवशे, नवशे, गवशे असे सगळेच होते. नियमितपणे सिनेमे पाहणारे होते. तसेच, कधीही सिनेमाच्या वाटेला न जाणारेही होते. प्राधान्याने इंग्रजी सिनेमे पाहणारे होते. टीव्हीवर किंवा ‘ओटीटी’वर आल्यावरच पाहू, असे म्हणणारेही थिएटरमध्ये आले होते. ‘प्रपोगंडा फिल्म’ म्हणून कितीही ओरड झाली तरीही प्रेक्षकांनी ‘धुरंधर’ आवर्जून पाहिला. त्यांना तो आवडला. कित्येकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला. सत्ताधाऱ्यांची आरती ओवाळण्याचे किंवा त्यांचा ‘छुपा अजेंडा’ राबवण्याचे जे आरोप ‘धुरंधर’वर झाले, तसे काही प्रसंग वगळता ‘क्राईम’ ‘सस्पेन्स’ ‘थ्रीलर’ ‘पॉलीटिकल’ धाटणीचा हा सिनेमा पाहण्यायोग्य होता, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये हिंदीत ज्या पध्दतीचे सिनेमे तयार होत होते आणि प्रेक्षकांकडूनही ते पाहिले जात होते. त्या तुलनेत ‘धुरंधर’चा विषय, व्याप्ती, आवाका खूपच मोठा होता. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आवश्यक मसाला ठासून भरलेला होता. सिनेमाला वेगळ्या प्रकारची ‘ट्रीटमेंट’ देण्यात आली होती. सिनेमागृहाच्या भव्य पडद्यावर आपण काहीतरी वेगळंच, विलक्षण पाहतोय, याची जाणीव प्रेक्षकांना होत होती. त्यामुळेच सोशल मिडीयाच्या वेगवान युगातही थिएटरमध्ये जाऊन तासनतास घालवून, बऱ्यापैकी खर्च करून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याचा आनंद लुटला. ‘धुरंधर’मुळे हिंदी चित्रपट व्यवसायाला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था प्राप्त झाली, त्याचे पुनरूज्जीवन झाले. ‘धुरंधर’ सारखे भव्यदिव्य सिनेमे बाजारपेठेवर वर्चस्व गाजवतात. जास्तीचे शो पदरात पाडून घेतानाच शुक्रवार, शनिवार, रविवारचे ‘ओपनिंग वीकेंड’ काबीज करतात. जेव्हा-जेव्हा बिगबजेट, मल्टीस्टार सिनेमे रिलीज होतात, ते हिंदी असोत की इतर भाषीय. तेव्हा-तेव्हा मराठी सिनेमांचे कंबरडे मोडण्याचे प्रकार होतात. ‘धुरंधर’च्या लाटेतही तेच झाले. मराठी सिनेमांचे तीन तेरा वाजले. एकतर बहुतांश मराठी निर्मात्यांनी ‘धुरंधर’समोर आपले सिनेमे रिलीज केले नाहीत. ज्यांनी धाडसाने केले, त्यांना शो मिळाले नाहीत. ज्यांना मिळाले, त्यांचे शो ऐनवेळी रद्द करण्यात आले.

उदाहरणच द्यायचे झाल्यास…
‘धुरंधर २’ च्या वेळी ‘तिघी’ हा मराठी सिनेमा चांगला होता. तरीही ‘धुरंधर’साठी त्याचे बरेच शो कमी करण्यात आले आणि गैरसोयीची वेळ असणारे शो ठेवण्यात आले. हिंदी असो, दाक्षिणात्य असोत किंवा इंग्रजीतील मल्टीस्टार, बिगबजेट सिनेमे असोत, ते संपूर्ण देशात रिलीज केले जातात. पुरेपूर अभ्यास, नियोजनबध्द तयारी, जाहिरातींवर करोडो रूपये खर्चून वाजतगाजत त्यांचे प्रमोशन केले जाते. अशा सिनेमांसाठी थिएटर चालक-मालक पायघड्या घालतात. मल्टीप्लेक्स असो की एकपडदा सिनेमागृह, करार भाडेपट्टाने असो की टक्केवारीच्या गणितानुसार कोणत्याही पातळीवर जात ते रग्गड कमाई करून घेतात.
मराठी सिनेमांच्या बाबतीत असे काही होताना दिसत नाही..
मुळातच बजेट कमी आहे, असे सांगूनच मराठी सिनेमा निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. पुढे प्रत्येक बाबतीत बजेटचे रडगाणे कायम असते. बजेटअभावी नाईलाजाने बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात, ज्याचा परिणाम सिनेमांच्या दर्जावर होतो. चांगल्या कलाकारांनाही योग्य मानधन दिले जात नाही. उत्तम कॅमेरा, साऊंड, व्हीएफएक्स, एडिटिंग परवडत नाही. प्रमोशन, मार्केटिंग अपेक्षेप्रमाणे होत नाही. अशा अनेक विवंचनेतून कसाबसा तयार झालेला सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होतो, तेव्हा तो तिकीट खिडकीवर चालत नाही. कित्येक मराठी सिनेमे सोमवार सुध्दा पाहत नाही. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत ते गायब होतात. बरेच सिनेमे पहिल्याच दिवशी प्राण सोडतात. अनेक सिनेमे तयार असूनही विविध अडचणींमुळे प्रदर्शित होत नाहीत. तगडी स्टारकास्ट असूनही अनेक सिनेमे प्रेक्षकांकडून नाकारले जातात. एकाच दिवशी अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि एकमेकांचे नुकसान करतात, हे जुने आणि ‘अवघड जागेचे दुखणे’ आहे. समन्वयाचा अभाव, अहंभाव अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू किंवा इंग्रजीतील लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट मराठीच्या बरोबरीने प्रदर्शित होतात, तेव्हा मराठीचा हक्काचा प्रेक्षकही तिकडे वळतो. नंतर तिकडेच रमतो.
प्रभासचा ‘बाहुबली’, अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’, यशचा ‘केजीएफ’, ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’, विकी कौशलचा ‘छावा’, रजनीकांतचा ‘कुली’, थलपती विजयचा ‘लिओ’ असे कित्येक अमराठी सिनेमांना (सिक्वेल-प्रिक्वेल) कोट्यवधींचा गल्ला मिळवून देण्यात मराठी प्रेक्षकांचाच मोठा वाटा आहे. याच मराठी प्रेक्षकांची मराठी सिनेमांकडे पाठ असते. त्याची निश्चित अशी कारणे आहेत. ती समजून घेऊन ही उदासीनता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आधी मराठी सिनेमांचा दर्जा सुधारला पाहिजे. विनोदाच्या नावाखाली अगदीच भिकार सिनेमे देणे बंद केले पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी व्हायला हवी, अशा काही प्रेक्षकांच्या अपेक्षा असतील तर त्यात गैर काहीच नाही. मराठीत एखादा विनोदी तथा प्रेमकथेचा चित्रपट यशस्वी झाला की, त्याच पध्दतीच्या सिनेमांची रांग लागते. फालतूच म्हणावे लागतील, अशा सिनेमांचा भरणा दिसून येतो. एकाच धाटणीच्या किंवा त्याच त्या पध्दतीच्या चित्रपटांना प्रेक्षक पूर्णपणे कंटाळले आहेत. तरीही तशाच सिनेमांचा भडिमार होत असतो.
एकीकडे असे नकारात्मक वातावरण असले तरी, सकारात्मक बाब म्हणजे चांगले सिनेमेही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ ‘डबल सीट’ ‘सैराट’ ‘नटसम्राट’ ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ ‘मुळशी पॅटर्न’ ‘झिम्मा’ ‘पावनखिंड’ ‘धर्मवीर’ ‘वेड’ ‘बाईपण देगा देवा’ ‘नाच गं घुमा’ ‘गुलकंद’ ‘आता थांबायच नाय’ ‘जारण’, ‘दशावतार’, ‘क्रांती ज्योती विद्यालय’ अशी मराठीतील काही प्रातिनिधीक उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रात वर्षाकाठी १००-१२५ सिनेमे तयार होत असतील, असे मानले तरी राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रासह ठरावीक ठिकाणीच मराठी चित्रपट बऱ्यापैकी व्यवसाय करतात. मराठी सिनेमांची पुरेशी पूर्वप्रसिध्दी होत नाही म्हणून प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. परिणामी, मराठी सिनेमे पाहिले जात नाहीत. त्यात भर म्हणजे, मराठी प्रेक्षकांचा कल थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा तो ओटीटीवर, टीव्हीवर आल्यानंतर पाहू, असा असतो. तिकीटांचे दर व इतर खर्च परवडणारा नसतो, हे त्यामागचे प्रमुख कारण.
मराठी सिनेमांसाठी जे निर्माते गुंतवणूक करतात, त्यांना मर्यादा असतात. परतावा मिळत नसल्याचे सांगत अनेक निर्माते हात आखडता घेतात. कार्पोरेट कंपन्या मराठी सिनेमांवर एकतर पैसा लावत नाही. लावलाच तर कंपन्यांच्या अटी, शर्तींमुळे निर्मात्यांना फारसा लाभ होत नाही. ओटीटी वाहिन्या मराठी सिनेमांना फारसा भाव देत नाही. अनेक निर्माते एकत्र येऊन सिनेमा काढण्याचा पर्याय आहे, त्यावर फारसा गांभीर्याने विचार होत नाही. ‘वन टाईम प्रोड्यूसर’ असतात, त्यांना या क्षेत्रातील फारशी माहिती नसते. मात्र, त्यांचे वेगळे ‘इंटरेस्ट’ असतात. काही प्रमाणात निर्मात्यांना ‘बकरा’ बनवण्याची प्रवृत्ती दिसून येते. ‘कंपूशाही’मुळे चांगल्या कलाकारांना कामे मिळत नाही. तेच ते चेहरे पुन्हा पुन्हा दिसतात. ‘गॉसिपिंग’ करण्यात धन्यता मानणारे सक्रीय असतात. या सर्वांचे जे दुष्परिणाम आहेत, ते संपूर्ण ‘फिल्म इंडस्ट्री’ला भोगावे लागतात. प्रतिकूल परिस्थिती असताना महाराष्ट्रातच मराठी सिनेमा दुर्लक्षित केला जातोय. इतर वेळी मराठीचा चौफेर गजर, घोष सुरू असतो. मात्र, अन्य भाषिक सिनेमांचे विशेषत: हिंदी सिनेमांचे मराठीवर अतिक्रमण होत असताना सगळीकडे चिडीचूप शांतता पसरते. सरकार आणि थिएटर मालकांची भूमिका सोयीची, संशयास्पद अशी का वाटते ?
अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. पूर्ण चित्र नकारात्मक झालेले नाही. ‘धुरंधर’ सारखे बिग-बजेट सिनेमे येतच राहणार. ते मराठी सिनेसृष्टीचे थेट शत्रू नाहीत. परंतू, त्यांचे अनियंत्रित वर्चस्व नक्कीच धोकादायक ठरणारे आहे. हिंदी असो, दाक्षिणात्य असोत की इंग्रजी सिनेमे, त्यांच्या जोरदार रेट्यात मराठी सिनेमांचे वेळोवेळी नुकसान झाले आहे. यापुढेही होतच राहील, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अब्जावधी रूपये खर्चून निर्माण होणाऱ्या सिनेमांमुळे तुलनेने दुबळ्या मराठी सिनेमांची गळचेपी होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. मराठी सिनेमा केवळ उद्योग, व्यवसाय नाही. तो संस्कृतीचा भागही आहे. त्याचे रक्षण झाले पाहिजे. त्याकरिता ही इंडस्ट्री टिकवली पाहिजे, त्याआधी ती जगवली पाहिजे. मराठी सिनेमांच्या मुळावर येणारे अतिक्रमण रोखायला हवे. यासाठी घरच्या प्रेक्षकांनी भक्कम साथ दिली पाहिजे. तुर्तास मराठी लोकांनी मराठी सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पहावेत आणि ते आवडल्यास आप्तेष्टांना, मित्रांना सिनेमा पहायला सांगायला हवे.
मराठीसाठी अधिकाधिक स्क्रीन मिळवणे. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे. स्मार्ट मार्केटिंगचा आधार घेणे, ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर करणे, अशा किंवा यासारख्या उपाययोजना असू शकतात.
मराठी सिनेमाला थेट हिंदी सिनेमांशी दोन हात करावे लागतात. हिंदी विरूध्दच्या या लढ्यात मराठीला हवे ते पाठबळ मिळत नाही. मराठी प्रेक्षकांचा सर्वाधिक फायदा हिंदी सिनेमांना होतो. तसा फायदा मराठी चित्रपटांना होत नाही. अनेकदा मराठी सिनेमांचा साधा ट्रेलरही लोकांपर्यंत पोहोचत नाही. प्रेक्षकसंख्येचे कारण देत मराठी सिनेमे थिएटरमधून काढून टाकले जातात. महाराष्ट्रात मराठी सिनेमांनाच जागा मिळणार नसेल तर कुठे मिळणार ? यासंदर्भात राज्य सरकारने प्रत्यक्ष कृती करून कठोरपणे धोरणे राबवायला हवीत. मराठीच्या बाबतीत मुजोरी करणाऱ्या थिएटर मालकांना नियमांच्या चौकटीत आणले पाहिजे. मराठीवर सातत्याने होणारे गळचेपीचे प्रकार यापुढेही होण्याची शक्यता दिसून येते. ते रोखण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच स्तरावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत.
सरतेशेवटी..
मराठीतही अनेक आदित्य धर संधीच्या प्रतिक्षेत…सशक्त आशय, कसदार अभिनय आणि उत्तम निर्मितीमूल्य जपणाऱ्या मल्याळी चित्रपटसृष्टीने आपले स्वतंत्र अस्तित्व जपले आहे, दरारा कायम ठेवला आहे. मल्याळी सिनेमांचे रिमेक करण्याचा मोह अनेकांना होतो. मूळ मल्याळी सिनेमा असलेल्या ‘दृश्यम’चे अनेक भाषेत रिमेक झाले. आता त्याचा सलग तिसरा भाग येतोय, हे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. मराठी सिनेमांमध्येही ती क्षमता नक्कीच आहे. किंबहुणा जास्तच आहे. सक्षम लेखक, दिग्दर्शकांची फौज मराठीत आहे. सर्वोत्तम सादरीकरण करणारे ताकदीचे कलाकार आहेत. त्यांना योग्य संधी मिळायला हवी. चांगल्या निर्मात्यांनी धाडस करून मराठी सिनेमा निर्मितीसाठी पुढे यायला हवे. आदित्य धर यांना ‘धुरंधर’साठी लाभलेले ‘प्रायोजक्तत्व’ सर्वांच्या नशीबी असणार नाही. अन्यथा, मराठीतही अनेक आदित्य धर केव्हापासून चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत आहेत.



















Join Our Whatsapp Group