पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मंगळवारी रात्री राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाकड येथील पार्क स्ट्रीट आणि सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत बहुसंख्य नागरिकांनी पार्थ पवार यांना जाहीररीत्या पाठिंबा दर्शवला असून वाकड परिसरातून मोठ्या संख्येने त्यांना मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
या जनसंवाद सभेचे आयोजन राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक नाना काटे, डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.
मावळ लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार निमित्त अजित पवार यांची पार्क स्ट्रीट सोसायटी वाकड येथे ‘जनसंवाद’ घेण्यात आला. या सभेला पार्क स्ट्रीट मधील आणि वूड्स सोसायटीमधील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. याप्रसंगी नागरिकांनी अजित पवारांशी ‘जनसंवाद’ साधून त्यांच्यासमोर विविध प्रश्न व समस्या मांडल्या. अजितदादांनी सर्व समस्या ऐकून त्यांची योग्य ती दखल घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले.
प्रथमच आमच्या समस्या, एका प्रशासनावर पकड असलेल्या कार्यक्षम नेत्यांनी ऐकल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी पार्थ पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वाकड परिसरातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही उपस्थित नागरिकांनी दिली.