पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत नागरिक, विद्यार्थी व महिलांना लाभ दिला जातो. यंदा वर्षभरात प्रमुख योजनांचा लाभ तब्बल 8 हजार 738 जणांनी घेतला आहे. तर, 2 हजार 364 दिव्यांगांना (निवृत्ती वेतन) पेन्शनचा लाभ मिळत आहे.
पालिकेतर्फे शहरातील महिला व बालकांचे कल्याण, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, गरीब, दिव्यांग व मागासवर्गीय व्यक्तींच्या विकासाकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. नव्या नियमानुसार लाभार्थ्यांच्या थेट बँक बचत खात्यात रक्कम अदा केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ मिळतो. त्यासाठी प्रथम साहित्य खरेदी करून त्याची ‘जीएसटी’ची पावती सादर करणे आवश्यक आहे.
त्यात मागासवर्गीय विद्यार्थी आणि सर्व मुलींना सायकलींसाठी प्रत्येकी 4 हजार रुपये अर्थसाहाय्य केले जाते. त्यानुसार 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षांत एकूण 670 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलींचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. ही एकूण रक्कम 26 लाख 78 हजार 845 इतकी आहे. तर, वर्षभरात एकूण 555 विद्यार्थिंनींना सायकलीसाठी 4 हजार रुपयांप्रमाणे एकूण 22 लाख 20 हजाराचे अर्थसाहाय्य बँक खात्यावर जमा केले गेले आहे. महापालिका महिलांना शिवणयंत्रासाठी 6 हजार अर्थसाहाय्य करते. या योजनेचा लाभ वर्षभरात 5 हजार 149 महिलांनी घेतला आहे. त्यापोटी एकूण 3 कोटी 8 लाख 95 हजार 787 रुपयांचे अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहे. दरम्यान, आवश्यक सर्व कागदपत्रे जमा न केल्यास अर्जदाराचा अर्ज बाद केला जातो, असा अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. त्याचे अर्ज पात्र करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कल्याणकारी योजनेचा 90 टक्केपेक्षा अधिक निधी खर्च झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
दिव्यांग पेन्शन योजनेत दरमहा २ हजार रुपये
पालिकेने नव्याने दिव्यांगांसाठी दरमहा 2 हजार रुपये पेन्शन योजना सुरू केली आहे. त्यासाठी एकूण 2 हजार 364 दिव्यांग पात्र ठरले आहेत. दर 6 महिन्यांनी दिव्यांगांच्या बँक खात्यात 12 हजार रुपयांप्रमाणे वर्षांसाठी 24 हजार रुपये जमा केले जातात. त्यापोटी वर्षभरात एकूण 4 कोटी 99 लाख 92 हजार 600 रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे.