पिंपरी (Pclive7.com):- कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदाराला हृदविकाराचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निगडी येथे रविवारी (दि.५) ही घटना घडली. बाळासाहेब महालिंग नंदुर्गे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
बीडच्या आष्टीतील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. पोलिस नाईक नंदुर्गे हे निगडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. ते शनिवारी (दि. ४) रात्री नऊला कामावर गेले. दरम्यान, रविवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना निगडीतील रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर थेरगावातील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.