पिंपरी (Pclive7.com):- भुमकर चौकातील रस्त्यावर ऑईलची गळती झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात झाले. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात सुमारे ३० ते ३५ दुचाकीस्वार घसरून पडले. त्यात अनेक जण किरकोळ जखमी देखील झाले. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या मदतीने अग्निशामक दलाने रस्त्यावरील ऑईल धुवून काढल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.
आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भुमकर चौक येथील रस्त्यावर भरपूर प्रमाणात ऑईल गळती झाली होती. त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस वाहने घसरून अनेकजण जखमी झाले. तेथून जात असलेले सजग नागरिक अभिजीत जाधव यांनी घडलेला प्रकार थेरगाव सोशल फाउंडेशनला दूरध्वनी करून कळवला. त्यानंतर थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, राहुल जाधव, अंकुश कुदळे, श्रीकांत धावारे, अभिजीत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून वाहतूक वळवली व त्या ठिकाणी कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेतली. त्याठिकाणी उपस्थित असलेले वाहतूक पोलीस यांची देखील खूप मदत झाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीने पूर्ण रस्ता धुऊन काढला व वाहतूक पूर्ववत केली.