पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी अक्षय तृतीया मुहूर्त साधत रणशिंग फुंकले आहे. आज मंगळवार दि.७ रोजी भोसरी, शितलबाग येथे दुपारी २ वाजता त्यांच्या निवडणुकीच्या ‘वॉररूम’चे उद्घाटन भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून भाजपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
नुकतेच लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभेवर आपली पकड मजबूत करून घेतली आहे. एक प्रकारे त्यांनी विधानसभेची रंगीत तालीमच केल्याची चर्चा आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महेश लांडगे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या ‘वॉररूम’चे उद्घाटन करत भोसरीचा ‘आखाडा’ यावेळीही आपणच मारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले असल्याची चर्चा आहे.